गुरुवार, 21 फ़रवरी 2008

भिमराव पांचाळे

नभातले तारे

तु नभातले तारे माळलेस का?... तेव्‍हा
माझियाच स्‍वप्‍नांना जाळलेस का? तेव्‍हा
तु नभातले तारे माळलेस का?....

आज का तुला माझे एवढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का ?....तेव्‍हा।।

हे तुझे मला आता वाचणे सुरु झाले
एक पान ही माझे चाळलेस का ?....तेव्‍हा।।

चुंबिलास तु माझा शब्‍द शब्‍द एकांकी
ओठ नेमके माझे टाळलेस का ?... तेव्‍हा



आयुष्‍य

आयुष्‍य तेच आहे
अन् हाच पेच आहे

बोलु घरी कुणाशी
तेही सुनेच आहे

तू भेटसी नव्‍याने
बाकी जूनेच आहे

केलीस याद तु ही
का हे खरेच आहे



सरकनारे किनारे

मी किनारे सरकतांना पाहिले
मी मला आक्रंदतांना पाहिले

कोणती जादू अशी केलीस तू
मी धुके गंधाळतांना पाहिले
मी किनारे सरकतांना पाहिले

पाकळ्या खंतावूनी जेव्‍हा गळाल्‍या
मी फुलांना झिंगतांना पाहिले
मी किनारे सरकतांना पाहिले

लोक ते मागे फिराया लागले
मी तुला रेंगाळतांना पाहिले
मी किनारे सरकतांना पाहिले


तुझा गोडवा

तुझा तसाच गोडवा असेल ही नसेल ही।
तसा उन्‍हात गारवा असेल ही नसेल ही।।

अजून रोज हिंडते नभात एक पाखरु।
उदास तोच पारवा असेल ही नसेल ही।।
तुझा तसाच गोडवा असेल ही नसेल ही !!

निवांत एकटाच मी निवांत ही तुझी नशा।
तुझ्या स्‍वरात मारवा असेल ही नसेल ही ।।

किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती ।।
हवी तशीच ही हवा असेल ही नसेल ही।।