गुरुवार, 21 फ़रवरी 2008

उत्‍सव

भारत हा उत्‍सव प्रिय देश आहे असे म्‍हणतात. हे उत्‍सवीपण आता एवढे आततायी आणि उतावळे झाले आहे की बहुतेकांना बरेदा नकोशे झालेले आहे. तरीही हा उत्‍सवांच्‍या नावाखाली हौदोस चालुच आहे. आमच्‍या उत्‍सवाच्‍या कल्‍पना व संकल्‍पना एवढ्या बदललेल्‍या आहेत की त्‍याला उत्‍सव म्‍हणयचा का हा प्रश्‍न पडतो. आमची परंपरा दिव्‍यांची आरास लावून दिवाळी मानायची, शेतात राबणा-या बैलाचे ऋण फेडायचे म्‍हणून पोळा साजरी करण्‍याची असतांना आता मात्र साजरा होणारा प्रत्‍येक दिवस, सण मग दिवाळी असो कि रोझ डे किंवा व्‍हैलेंटाईन असो की होळी, सेलिब्रेट करण्‍याची त-हा ही हौदोसी उत्‍सवांच्‍या व्‍याखेतच मोडत असते. असे उत्‍सव सेलिब्रेट करतांना आम्‍ही नेमके काय करतो ते सुद्धा पाहणे अगत्‍याचे ठरते. उत्‍सव म्‍हटला की अंधारी आणणारी आतषिबाजी किंवा कानाचे पडदे फाडणा-या फटाकांच्‍या स्‍फोट, त्‍यात कानठळ्या बसविणारे अश्‍लील संगीत, भडक रंगांत भपकेदार श्रीमंती दाखविणा-या कापडातील तर्राट झालेली स्‍त्री-पुरुष, अश्‍लील गाण्‍यांच्‍या रिमिक्‍स ठेक्‍यांवर स्‍वतःला सांभाळत परदेशी शिष्‍टाचार पाळत असतात. अशा ह्या उत्‍सवात सहभागी होणा-या प्रत्‍येकाच्‍या मनात रेंगाळणारे विचार ही मात्र किळ्यासांरखेच असतात. आणि शेवटी चमचमीत खाण्‍याने ह्या उत्‍सवांची सांगता ही होते. हे सर्व सांगण्‍याचे कारण म्‍हणजे दरवर्षी येणारा आणि तेवढ्याच जल्‍लोषात साजरा होणार नववर्षाचा दिवस.

ह्या वर्षी नववर्ष साजरे करण्‍यासाठी तरुण 20 ते 25 हजार रुपये तर चाळीशीतील व्‍यक्ति 10 ते 15 हजार रुपये उधळणार, असे सर्वेक्षण करुन काही वर्तमान पत्रांनी बातमी छापली आहे. जर हे सर्वेक्षण खरे असेल आणि खरेच जर सामान्‍यांकडे एवढे रुपये उधळण्‍यासाठी आले असतील तर आमच्‍या सारख्‍यांची हीच चिंता आहे की ह्या उत्‍सवांचा रंग कसा असेल. का केवळ इतरांनी ही बातमी वाचून आपल्‍या खिशातील महिण्‍यासाठी उरलेले 2 ते 3 हजार रुपये ही खर्च करावे हा उद्देश आहे, हे सांगणे कठीण आहे. नववर्षाच्‍या रात्री एका पंचतारांकीत हॉटेलच्‍या बाहेर एका पुरुषांच्‍या गटाने दोन महिलांचा विनयभंग केला. या बाबत कोणतीही तक्रार पोलिस ठाण्‍यात करण्‍यात आली नाही अशी बातमी लोकमत ने सुद्धा प्रकाशित केली आहे. एका इंग्रजी दैनिकाने या घटनेची छायाचित्रे प्रसिद्ध केल्‍यामुळे ही खळबळ उडाली आहे. 70 ते 80 जणांच्‍या गटांने या महिलांचे कपडे फाडून त्‍यांच्‍याशी गैरवर्तन केले आहे, ह्या महिला आपल्‍या मित्रांबरोबर हॉटेल मधून बाहेर पडून जुहू बीचकडे जात होत्‍या. अशीच एक दूसरी बातमी कानपूर शहरातील आहे कि थर्टिफस्‍ट साजरा करीत असतांना मद्यधुंद अवस्‍थेत गोंधळ घालणा-या सुमारे 300 तरुणांना वनवर्षाच्‍या पहिल्‍या पहाटे पोलीस कोठडीची हवा खावी लागली. आणखीही एक बातमी आहे...अहो किती बातम्‍या अशा सांगाव्‍यात. आपण सुद्धा वाचत असताच ना... माझ्यापेक्षा आपल्‍याकडेच अशा बातम्‍यांचे संदर्भ जास्‍त असतील.
एकी कडे नववर्षाचे रंगीबेरंगी फुगे फुटपाथवर विकुन आपली सांज भागविणारे झोपडपट्टीतील मुले, सिग्‍नलवर थांबलेल्‍या गाड्याच्‍या खिडकीजवळ कॅलेंडर विकणा-या बायका, केवळ टिवी समोर रात्री बारा वाजेपर्यंत बसुन न्‍युइअर साजरे करणारे पांढरपेशे मध्‍यम वर्गीय यांना तर उत्‍सव किंवा सण म्‍हणजे काय हेच सांगायची वेळ आली आहे.

इतरांनी त्‍यांचे पैसे कसे खर्च करावे हा जरी ज्‍याचा त्‍याचा प्रश्‍न असला तरी तो जर अशा उत्‍सवी रितीने उधळल्‍या जात असेल तर ते समाज विघातकच आहे, हे वेगळे सांगायची गरज पडू नये. वाईट चाली रितींना कधी तरी कुणी तरी आळा घालने आवश्‍यक असतेच. याचा अर्थ उत्‍सव करु नये असा नव्‍हे, तर उत्‍सवांचे स्‍वरुप बदलण्‍याची ही खरी वेळ आहे. कुठलाही उत्‍सव, सोहळा वाटावा, मनाला चिंतनशिल बनविणारा, भविष्‍याचा वेध घेणारा असावा हे वाटणे सहाजिक आहे. आम्‍ही आमच्‍या पासून, आमच्‍या घरातून जो पर्यंत ख-या उत्‍सवाचा आरंभ करीत नाही तो पर्यंत हा हौदोस चालुच राहणार आहे. आणि येणारी पिढी ही अशीच बेवडी, चमचमित खाण्‍यासाठी पिणारी, व्‍यभिचारी, स्‍वतःपुरतीच संकुचित झालेली असेल हे सांगायला कुण्‍या भटाची गरज नाही.

हरेक आवाज आज अर्ध्‍यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाट तारा
उजेड येई दिव्‍या दिव्‍यातूनी बाटलेला

असे असले तरीही, हे वर्ष, हौदोसी उत्‍सवांना अंकुश बसविणारे, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद खरे ठरविणारे, सामाजाभिमुख विकासाचे व प्रगतिचे जावो हिच सदिच्‍छा.