गुरुवार, 21 फ़रवरी 2008

पाणी

वैशाखी दुपार. उन मी म्‍हणत होते. पाण्‍यातल्‍या लहरीसारख्‍या उन्‍हाच्‍या तारा नजरेसमोर नाचत होत्‍या. उजाडल्‍या पासून शेताता कामावर आलेल्‍यांनी परतीची वाट धरली होती. उन्‍हाळ्याच्‍या दि‍वसांत एक पारगीच काम असतं. भल्‍या पहाटे शेतातल्‍या कामांना सुरवात होते अन् दि‍वस माथ्‍यावर येईस्‍तोवर काम आटोपलं जाते. पायाखाली सावल्‍या आल्‍या की बैलगाडी - नांगरा सोबत थकलेले, घामेजलेले, काळवट चेहरे गांवच्‍या दि‍शेने नि‍घालेले दि‍सतात. डोक्‍यावर इंधनाचे भारे अन् तुटलेल्‍या चपलां घासत मळकट हि‍रवी-लाल लूगडी परतीच्‍या वाटेवर दि‍सतात. लुगड्यांवर ढि‍गळ असावं तसा कडेवर लहानगा चि‍टकून असतो. डोक्‍यावर पाण्‍याचं रि‍कामं झालेलं भांड अन् न्‍याहरीच्‍या फडक्‍यात खुरपी गुंडाळून गुडघ्‍यापर्यंत खोचून घेतलेले परकर ही त्‍यांच्‍या मागे पुढे धावत असतांत. भर दुपारचं उन त्‍यात त्‍याच्‍या बसणा-या झावा जि‍वाची लाही-लाही करुन सोडतात. उन्‍हाळ्यात मळ्यातल्‍या वि‍हीरींचे पाणी ही खोल गेलेलं असतं. अर्ध्‍या-अर्ध्‍या घंट्याने पाण्‍याचे उपसे काढावे लागतात तेव्‍हा कुठे दि‍ड दोन गुंठे ओलीत होते. आताच उपसा काढून दुस-या उपस्‍याची वाट पाहत मी वि‍हीरीच्‍या जवळ झाडाखाली अंग टाकलं होतं. उन्‍हाच्‍या झावा केळीच्‍या पट्ट्यातून आल्‍या की गारवा घेवून येतं. हौदातलं नि‍तळ पाणी अजून झि‍रपत होतं. झ-यासारखं ते अजून ही दांडातून वाहत होतं. आमची हाळी कुत्री पि‍साटल्‍या सारखी उन्‍हातून आली अन् फस्कन हौदात जावून बसली. नि‍तळ पाण्‍यात तीचं बसनं माझ्या मनाला चावलं. आता गुळणा करायचा झाला तर ह्याच पाण्‍याचा करायचा का? मी तीच्याकडे दगड फेकला तशी ती किंचाळत केळीच्‍या पट्ट्यात शि‍रली अन् चि‍खलात पाय पसरुन जि‍भे सोबत सारं शरीर हलवत बसली. गावच्‍या वाटेवर परतीची एक दोन पावले सोडली तर जंगलात चि‍ट पाखरु नसतं. रात्रीच्‍या रातकि‍ड्यांनी दि‍वसा सूर लावलेला असतो. आमचा मळा गावापासून बराच लांब आहे. उन्‍हाळ्याच्‍या दि‍वसात तहान भागवायचं तस हे एकच ठि‍काण. एकदा का मळा सोडला तर गावापर्यंत पाणी कुठे मि‍ळायचं नाही. बांधावरच्‍या कडूनिंबाच्‍या सावलीत धापा टाकत येवून दोघ्‍या जणी थांबल्‍या. त्‍यांनी डोक्‍यावरचे इंधनाचे भारे खाली फेकून पदराने तोंडावरचा घाम पुसला. त्‍यातली एक माझ्याकडे येत म्‍हणाली, 'पाणी न्‍हाईकाय रे भाउ, जरा मशीन चालू करणं बापा, लय तहान लागली आमाले'. मी काही बोलणार एवढ्यात तीच परत म्‍हणाली, त्‍या मास्‍तरबोवाचा मया हाय ना हा? मी फक्‍त 'हो' म्‍हणालो. लाईट नाईकाय आता? मशीन चालू करणं..' तहान अन् ती शमवि‍ण्‍याची ओढ तीच्‍या चेह-यावर भि‍जत होती.
'येवं शांते..' तीने दुसरीला आवाज दि‍ला. आतापर्यंत कडूनिंबाच्‍या सावलीत घाम पुसत बसलेली शांती 'हाय कायवं पाणी' म्‍हणत जवळ आली.
'मी आत्‍ताच संघवा काढला, पाणी लय खोल गेलं, मशीन पाणी ओढत नाही म्‍हणून त बंद केली...' मी त्‍या दोघींना सांगि‍तले.



'मंग दोर बाल्‍टी असीन त दे आमी काढतो पाणी' शांती इकडे ति‍कडे पोहरा शोधत म्‍हणाली.
'दोर बाल्‍डी आहे पण पाणी खुप खोल गेलं, बाल्‍डी पाण्‍यापर्यंत पोहचतच नाही...' मी उत्‍तर दि‍लं.
वि‍हीर समोर होती पण पाणी तरीहि‍ मि‍ळत नाही, हे पाहून दोघींची व्‍याकुळता वाढली. तहान अन् पाण्‍याचं नात असचं असतं. वेळेवर मि‍ळालं तर जीवन नाही तर मरण.

'मी दोर पोहरा घेवून वि‍हीरीत उतरतो अन् पोहराभर पाणी काढतो तुम्‍ही मला थोडी मदत करा वि‍हीरीत उतरण्‍यासाठी....' त्‍यांची पाण्‍यासाठीची कासावि‍स बघुन मी म्‍हणालो. त्‍यावर त्‍या दोघी एकदम दचकल्‍याच.. 'नाई ... नाई ... आमी या हौदातलंच पाणी पीतो...' त्‍या घाबरल्‍या सारख्‍या ओरडल्‍या.
'अहो त्‍यात आत्‍ताच कुत्री बसून गेली.. तीने गढूळ केलं सारं पाणी... थांबा मी काढून देतो ना तुम्‍हाला वि‍हीरीतलं पाणी... ' मी म्‍हणालो.
पण त्‍या दोघीही ऐकेनात. त्‍या हौदाकडे वळल्‍यात, तहानेने व्‍याकुळलेल्‍या त्‍या दोघींची मला अधि‍कच दया आली. त्‍यांच हौदातील कुत्रीने गढूळ केलेलं पाणी पीणे मला आवडलं नाही. मी घाई घाईने पोहरा घेवून वि‍हीरीत उतरायला लागलो. 'तुह्या हातचं पाणी न्‍हाई पायजे रे बाबा आमाले, तु त्‍या बौद्ध मास्‍तरचाच पोरगा हायेस ना?' त्‍यांनी किंचाळल्‍या सारखं मला वि‍चारले. मी मान हलवत हो म्‍हणालो. 'मंग नको आमाले पाणी' आमी तश्‍याच जातो राऊ दे ते पाणी-फाणी....' त्‍यांचे हे स्‍पष्‍टीकरण ऐकून माझ्याच तोंडचे पाणी पळाले. शरमल्‍या सारखे झालं मला. पाणी म्‍हणजे जीवन, शाळेत शि‍कलो होतो, व्‍यवहारात सुद्धा ते पटलं होतं. पण जात ही पाण्‍यापेक्षा ही जीवन मरणाचे कठोर सत्‍य असते, हे वास्‍तव वि‍स्‍तवाचा चटका लावून गेले. हौदातल्‍या पाण्‍याचे गुळणे करत, त्‍या दोघींनी तोंडावरुन हात फि‍रवि‍ला अन् घोट घोट पाणी पि‍वून त्‍या रस्‍त्‍याला लागल्‍या. मी हातात दोर पोहरा घेवून दूरपर्यंत त्‍यांनी पाहत होतों.